Monday, December 8, 2014
जयकर....
नागपूर ला येऊन खूप दिवस झाले तरी नागपूर विद्यापीठाला अजूनपर्यंत भेट दिली नव्हती. काल परवा प्रथमच नागपूर विद्यापीठात गेलो होतो.प्रथम भेटीत प्रेमात पडाव अस नागपूर विद्यापीठ मुळीच नाही,कारण ही त्याला सहज सांगता येईल.विद्यापीठाचे विविध विभाग शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहे म्हणजे एक एकीकडे अन दुसरा भलतीकडे...विद्यापीठाची मेन बिल्डिंग रविनगरच्या अमरावती रोड ला...लायब्ररी नॉर्थ अंबाझरी रोड वर...परिक्षा विभाग भारत नगर च्या एलआयटी मध्ये..तर विद्यार्थी हॉस्टेल रविनगर स्कोअर ला...त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.वेळ ,पैसा ,श्रम खर्च झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तोंडून न कळत विद्यापीठाबाबत म्हणजेच व्यवस्थेबाबत वैदर्भिय अपशब्द बाहेर येतात.(कधी कधी आपण अपशब्द उच्चारण्या पलीकडे काही करू शकत नाही....)
एका मित्राच्या नेट परीक्षेच्या फॉर्म चे सबमिशन करणे हे माझ्या विद्यापीठ भेटीच निमित्त होत.या विद्यापीठाचा तीन चार ठिकाणाचा तमाशा पूर्व माहित असल्यामुळे आणि आपली गैरसोय टाळावी म्हणून मी अगोदरच माझ्या मित्रांकडून फॉर्म नेमक्या कोणत्या ठिकाणी सबमिट करावा याची माहिती घेतली होती. त्यांनी सांगितल्यानुसार ‘भाऊसाहेब कोलते लायब्ररी’त फॉर्म जमा करण्यासाठी जायचं होत.चौकातील एका रिक्षावाल्या काकांना म्हणालो “भाऊसाहेब कोलते लायब्ररी जाना है I ” क्षणभर विस्मयाने माझ्याकडे पाहत त्यांनी मलाच विचारले “कहा है?” “झाशी राणी चौक के आगे..”... मी. “चालीस रुपये लगेंगे”...काकांनी रिक्षा सुरू करत भाडे वाक्य माझ्या कानावर फेकल.मी हो म्हणत.. आमची रिक्षा भाऊसाहेब लायब्ररी चा शोध घेत झाशी राणी चौकाकडे धावू लागली.
मध्यंतरी काकांच्या प्रतिप्रश्नाने मला उमजले होते की,या काकांना सुद्धा ही लायब्ररी माहित नाही.परंतु काकांना हातच ग्राहक गमवायच नव्हतं आणि माझ्या जवळही वेगळा पर्याय नव्हताच.तीन चार व्यक्तींकडे विचारपूस करत करत शेवटी आम्ही मोठ्या कष्टाने ‘भाऊसाहेब कोलते लायब्ररी’ शोधून काढली आणि सापडली एकदाची असे भाव दोन्हींच्या चेहर्या वर प्रगट झाले.पैसे देतांना रिक्षावाले काका म्हणाले “अगलेसे यूनिवर्सिटी लायब्ररी बोलना...भाऊसाहेब कोलते को कोई पहेचानता नही...”
डॉ.व्ही.बी.उर्फ भाऊसाहेब कोलते...नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू...2000 मध्ये नागपूर विद्यापीठाच्या लायब्ररी ला त्यांचे नाव देण्यात आले परंतु अजूनही त्यांच्या नावाने ती लायब्ररी ओळखल्या जात नाही हे नागपूर विद्यापीठाचे दुर्दैव म्हणावे लागेल....
‘जयकर’ ला सोबत घेऊनच नवीन विद्यार्थी शक्यतो पुणे विद्यापीठात प्रवेश करीत असतात,म्हणजे ‘जयकर’ हे नाव त्यांना अगोदरच कोठून तरी माहित झालेल असत.म्हणूनच जयकर ला पाहण्याची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात दडलेली असते....पुणे विद्यापीठाच भव्य अस ते गेट..परंतु अवती भवती च्या गर्दीत लपलेल..बाहेरच बाजूला पोलिस चौकी..गेट च्या एका बाजूला विद्यार्थी सुविधा केंद्र..आधी तेथे पीआरओ चे राहते घर होते..तर दुसर्याप बाजूला पीएमटी चा बस स्टॉप...परंतु खरा गोंधळ होतो ते समोरील डाव्या,उजव्या बाजूचे दोन रस्ते पाहिल्यावर...तेथे कोणता रस्ता धरावा हा प्रश्न निर्माण होतो.उजव्या बाजूने हॉस्टेल ऑफिस,नवीन बांधलेल कॉमर्स डिपार्टमेंट...क्लास रूम कॉम्प्लेक्स ...हेल्थ सेंटर ..गणित विभाग...समोरच ओपेन कॅंटीन..खेर वाड्मय भवन करत विद्यापीठाची मेन बिल्डिंग...तर डाव्या बाजूने म्हणजेच पोलिस चौकी कडून पर्यावरण शास्र..बॉटनी..झुऑलजी डिपार्टमेंट करत जयकर च्या भव्य बिल्डिंग चे दर्शन होते.जयकर ला जाण्यासाठी हाच मार्ग सोईचा आहे.
‘जयकर’ ला पहिल्यांदा भेटल्यावर कोणत्या भावना मनात येतात?प्रत्येक विद्यार्थ्यासाठी याची उत्तरे निरनिराळी...जयकर ची परिभाषा कशी करावी ?याचेही उत्तरे प्रत्येकासाठी वेगवेगळीच...जयकर फक्त ‘ग्रंथालय’ आहे का ? की पाचशे-हजार विद्यार्थ्यांना सामावून घेणारी अभ्यासिका आहे?असे प्रश्न जयकर च्या विद्यार्थ्यासमोर उपस्थित केले तर त्याची येणारी उत्तरे जयकर ला ‘ग्रंथालय’ वा ‘अभ्यासिका’ म्हणून सीमित करू शकत नाही.एवढ जयकरच अन येथील विद्यार्थ्यांच भावनिक नात निर्माण झालेल असत.म्हणूनच येथे येणार्यान प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जयकर फक्त ग्रंथालय किंवा अभ्यासिका राहत नाही तर त्यांच्या भावविश्वातील एक ‘श्रद्धास्थान’ असत...
विद्यापीठात आलेला प्रत्येक विद्यार्थी ध्येय,स्वप्न जवळ बाळगून असतो.विद्यापीठातील भरावलेल वातावरण..नवीन नवीन अभ्यासाचा जोश..त्याला जयकरच्या अभ्यासी वातावरणाची सोबत...म्हणूनच विद्यार्थी जागेसाठी सकाळी सहा पासूनच जयकर ला गर्दी करतात.सुरवातीला सार काही सुरळीत सुरू असत म्हणजे अभ्यास एके अभ्यास..फक्त जयकर आणि आपण..कारण कुणी फारसं परिचयाच नसत.परंतु कालांतराने ओळखीचे चेहरे होतात..चेहर्यां ची ओळख होते आणि येथूनच जयकर ची व आपली ‘दोस्ती’ जुनी होत जाते...जयकर खर्यार अर्थाने कळत जाते...विद्यार्थ्यांचे अनेक प्रकार नकळत लक्षात येतात..सकाळ पासून रात्री पर्यंत अभ्यास करणारे विद्यार्थी...एक वेळच जेवणारे विद्यार्थी...सकाळी जयकरला बॅग ठेवल्यावर रात्रीच बॅग घेऊन जाणारे विद्यार्थी...अधून मधून जयकर ला भेट देणारे विद्यार्थी...सुरवातीला आपल्या ‘वर्गमैत्रिणीची’कालांतराने ‘गर्लफ्रेंड’ची जागा सांभाळणारे विद्यार्थी...गर्लफ्रेंड शोधणारे विद्यार्थी...(आमच्या एका मित्राच्या मते फुकट पेपर वाचणारे विद्यार्थी...) डाव्या उजव्या मताचे...समाजवादी..हिंदूत्ववादी ...फक्त नेट –सेट करणारे..फक्त नेट देणारे..फक्त सेट देणारे...तर काही फक्त यूपीएससी करणारे...काही फक्त एमपीएससी करणारे ...बहू अधिक दोन्ही चान्स घेणारे..काही फक्त बँकिंग चाच अभ्यास करणारे असे एक ना अनेक...यादरम्यान आपल एक आखीव –रेखीव टाइम टेबल तयार होत जात.सकाळी ६-७ ला जयकर ला भेट...बॅग ठेवून ‘अनिकेत’ मध्ये चहा-नाश्ता,९ वाजता पेपर साठी परत अनिकेत कडे..मग पेपर वाचन..अभ्यास...१२.३० ला जेवणासाठी जयकर च्या खाली..१.३० ला परत जयकर..थोडीशी झोप...परत अभ्यास...सायंकाळी ५ वाजता चहासाठी ‘अनिकेत’ किवा ‘ओपेन’ कडे...दरम्यान ठेका घेतल्यासारखे गल्ली पासून दिल्लीच्याही पुढील जागतिक विषयावरील त्या विषयातील तज्ञ समजून चर्चा..६ ते ८.३० जयकर..मग रात्रीच जेवण...परत रात्री ११पर्यंत जयकर...यातून आपल्यातील बदल आपल्यालाच कळत जातो.
जयकर ची स्वतची अशी काही वैशिष्ट्ये आहे.काही विद्यार्थ्यांना जयकर लवकर पावत.काही विद्यार्थ्यांना जयकर लवकर पावत नाही किंवा पावतच नाही.अस असल तरी जयकर कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांची ओंजळ रिकामी ठेवत नाही.जीवन जगण्यासाठी विविध समृद्ध अनुभवाची शिदोरी त्यांच्या सोबत देतच असते.ती शिदोरी आपल्याकडून कोणी हिरावून घेवू शकत नाही म्हणूनच येथील विद्यार्थ्यांच्या जीवनात जयकर ला ‘पंढरी’ चे स्थान आहे.
आजही एमपीएससी,यूपीएससी,नेट-सेट चे निकाल लागतात तेव्हा विद्यार्थी एकच विचारतात, ‘जयकर’ चे किती विद्यार्थी पास झाले.यातच ‘जयकर’ चे ‘स्वातंत्र अस्तित्व’ व ‘स्वातंत्र ओळख’ सामावली आहे. याठिकाणी प्रत्येक विद्यार्थी पुण्यात येवू शकणार नाही आणि ‘जयकर’ चा लाभ घेवू शकणार नाही ही बाब सुद्धा आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे म्हणूनच महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये ‘जयकर’ सारखी वातावरण निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे॰ येथे ‘जयकर’ ची थोरवी सांगणं हा उद्देश मुळीच नाही.परंतु इतर विद्यापीठांमध्ये आपण ‘जयकर’ निर्माण करू शकलो नाही,ही खंत मात्र नक्की आहे...
Tuesday, September 30, 2014
एका सायकलचा प्रवास....
मोटार सायकल रस्त्यावरून धावण्यापूर्वी ‘सायकल’ ला चार चाकीचा सन्मान होता. ज्यांच्याकडे सायकल असायची त्यांची गणना मध्यमवर्गीय श्रीमंत गटात व्हायची म्हणजेच श्रीमंतीचा ‘अंगणात सायकल’ हा पण एक निकष असायचा.आज लोक टू व्हीलर, फोर व्हीलर ची जी काळजी घेतात तीच काळजी त्यावेळेस सायकलची घ्यायचे.घरातून बाहेर पडतांना सायकल कपड्याने चकाचक व्हायची.सायकल च्या टायर मधील हवा तसेच सायकल चे ब्रेक ही तपासले जायचे.आठवड्यातून एकदा तरी ओइलिंग आणि सायकल वर पाणी पडायचे.काही छंदींच्या सायकलला तर आरसा अन रेडियम च्या प्लेट्स ची सजावट पण असायची.सायंकाळी रस्त्यावरून अनेक सायकली धावतांना दिसायच्या.सायकली चा एक वेगळाच मिजास होता.पुण्याची तर ‘सायकली’ चे शहर अशीही एक ओळख होती.त्याच पुण्यातील एका सायकलीच्या प्रवासाची ही गोष्ट....
पुणे विद्यापीठ म्हणजे हुशार,गरीब,होतकरू विद्यार्थ्यांचा गोतावळा.महाराष्ट्राच्या काण्या –कोपर्याबतुन हे विद्यार्थी कुणाच्या तरी मदतीने आणि कुणा कडून तरी प्राप्त ऐकिव माहिती वर शिक्षणाची भूक भागविण्यासाठी ,ध्येयप्राप्तीचे स्वप्न घेऊन विद्यापीठात ढेरेदाखल होतात.अशा विद्यार्थ्यांना आजही ‘सायकल’ हे वेळ व पैशाची बचत करणार आनंदाचे एक साधन वाटतं ,म्हणून अनेक विद्यार्थी विद्यापीठात व कामानिमित्त पुणे शहरात सायकल वरून फिरतांना दिसतात.
दिपक जाधव हा मूळचा सोलापूरचा.सोलापूरच्या ‘वालचंद’ चा विद्यार्थी. घरची परिस्थिती बेताचिच म्हणजे गरीबीची व्याख्या शिकण्याची कधी त्याला गरज पडली नाही,आतापर्यंत तो ती अनुभवत आला होता.बी.ए ला असतांनाच प्रा.नीला सरानी पुणे विद्यापीठाबद्दल बरच काही सांगितले होते. म्हणूनच एम.ए करायचे ते पुणे विद्यापीठातूनच हे त्याचं बी.ए ला असतानाच ठरलेल. त्यानुसार तो राज्यशास्र विभागात एम.ए ला प्रवेशित झाला.
राज्यशास्र विभाग विद्यापीठातील एक नावाजलेला विभाग.विद्वान प्राध्यापक आणि चळवळी विद्यार्थी यामुळे राज्यशास्र विभागाचे एक वेगळेच वलय विद्यापीठात आहे.सुरवातीला सार काही नवीन वाटते परंतु लवकरच कमवा शिका,विभाग,लेक्चर,जयकर,तात्विक चर्चा,अनिकेत,ओपन,आदर्श,ऐलीस गार्डन हे पुणे विद्यापीठातील विद्यार्थाच्या अंगात भिनत जाते आणि यातच पुणे विद्यापीठाचे वेगळेपण दडलेले आहे.
विद्यापीठात त्यावेळी वेगवेगळ्या कारणांसाठी विद्यार्थी आंदोलन करत,उपोषणाला बसत.कधी एम.फील-पी.एच.डी च्या विद्यावेतनाबाबत,कधी होस्टेल बाबत,कधी रिफेटरी,कॅंटीन च्या भाववाढीबाबत तर कधी नेट सेट च्या प्रश्नाबाबत...त्याच्या सोबतीला सिनेट मधील चर्चा,विभागातील विविध विषयांवरील चर्चासत्रे,विद्यापीठात साजर्यार होणार्याा जयंत्या आणि पुण्यतिथी,या सर्व घटनांना पत्रकारांच्या माध्यमातून वर्तमानपत्रात,माध्यमात प्रसिद्धी मिळायची.त्यामुळे एलेक्ट्रोनिक मेडिया,माध्यम,पत्रकारिता,पत्रकार हे शब्द खूप वजनदार वाटायला लागले.या सर्वांचा परिणाम म्हणजे ‘मेडिया’ हे एक बदलांचे ‘वलयांकित’ माध्यम आहे याची प्रथमच प्रकर्षाने जाणिव झाली,त्या जाणिवेतून दिपक सारखे अनेक मित्र पत्रकारितेकडे वळले.
पुणे विद्यापीठाच जर्नलिज्म,थेट विद्यापीठाच्या बाहेर एफसी रोड वरील रानडे इंस्टीट्यूट ला.साहजिकच पीएमटी ने पुणे विद्यापीठ ते म्हसोबा गेट जायचं आणि म्हसोबा गेट पासून पायी ‘रूपाली’, ‘वैशाली’ करत करत रानडेला पोहचायचे.यासाठी पीएमटी हा बेस्ट पर्याय परंतु त्यातील मुख्य अडचण म्हणजे पैशांची,म्हणूनच दिपक व त्याच्या मित्रांनी सायकलची व्यवस्था केली.पुणे विद्यापीठ ते रानडे हा नित्य नवीन अनुभव देणारा रोजचाच प्रवास त्यातून सुरू झाला.या मित्रांना जातांना फारसं काही वाटायचे नाही कारण जातांना उतारचा मार्ग परंतु येतांना मात्र त्यांची चांगलीच दमछाक व्हायची.त्यामुळे ते कधी कधी ज्ञानेश्वर पादुका चौकातून वरच्या मार्गाने सेनापती बापट रस्त्याला किंवा सिम्बिओसिस,गवर्नमेंट पोलिटेक्निक कडून विद्यापीठ गाठायचे.या प्रवासातून अन त्यांनी घेतलेल्या कष्टातून त्यांच्या पदरात पत्रकारितेची पदविका पडली.त्या आधारावर ते ‘पत्रकार’ म्हणून कार्यरत झाले.
दिपक ‘पुढारी’ला जॉइन झाला आणि त्याने ठरविले की,आपली सायकल आपल्या सारख्याच गरीब व होतकरू विद्यार्थ्याला वापरायला द्यायची पण ती एका अटीवर,ती म्हणजे त्या विद्यार्थ्याने सुद्धा सायकल चा वापर झाल्यानंतर दुसर्याय विद्यार्थ्याला ती वापरायला द्यायची.अशा प्रकारे दिपक च्या सायकलचा प्रवास एका हातून दुसर्यात हाती सुरू झाला.परंतु दुर्दैवाने जो मित्र ही सायकल वापरत होता त्याने ‘पत्रकार भवना’ जवळ ही सायकल ठेवली असतांना तेथून ती चोरीला गेली.परंतु ही झाली अपवादात्मक गोष्ट.आपल्याजवळ सुद्धा पुस्तके,रजिस्टर,इलेक्ट्रोंनिक साधने,कपडे,पादत्राणे,फर्निचर,टेबल लॅम्प ,सायकल,बॅग….यासारख्या अनेक वस्तु असतात की ज्या आपली गरज संपल्यावर दुसर्यां्च्या उपयोगी येणार्याे असतात.परंतु अनेकदा ह्या वस्तु आपल्याजवळ धूळ खात पडून असतात म्हणजेच आपल्याकडून दुसर्यांेच्या गरजांचा फारसा विचार होताना दिसत नाही. ‘विंदा’ ची देणार्याणने देत जावे....ही आमची मुखपाठ....परंतु कृतीत मात्र येत नाही.
वस्तूंच्या या प्रवासामध्ये मात्र एक काळजी असावी.तेथे फक्त ‘एकमेकांच्या गरजपुर्तींचा’ निखळ आनंद असावा.मान-अपमान,अहंकार,गरीब-श्रीमंत यासारख्या भावनांचा तेथे लवलेशही नसावा,म्हणजे तो ‘देण्या-घेण्याचा व्यवहार’ ठरत नाही.
आपल्याजवळ असणार्याह वस्तूंना सुद्धा असा प्रवास करता येईल का ???...
Wednesday, September 10, 2014
चित्र ....
ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी दिसणार एक चित्र...अनेक घरात घरातील लोकांपेक्षा गुरं ढोर अधिक असायची.गावातील पहाट गुराढोरांच्या हंबरण्याने व्हायची.घरातील कर्ता गुराढोरांच्या चारा पाण्यासाठी 'वाडया' ची वाट धरायचा..शेण पाणी करायचा.या गुराढोरांची भाषा ही त्याला माहीत होती... शेणामातीलाही सुगंध असतो हे नेहमी शेणा मातीचे हात असणार्याच त्या शेतकर्यांोना वेगळे काय सांगायचे होते...पशु धनाला त्यावेळेस प्रतिष्ठा होती,सन्मान होता...म्हणजेच शेतीचे 'आधुनिकीकरण' व 'यांत्रिकीकरण' व्हायचे बाकी होते....
.....पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणार्याी गुराढोराची नदी,नाले,धरणे यामधून मनसोक्त आंघोळ...नंतर बाजारातून आणलेल्या नवीन दाव,नाथ,मोरखी,बाशिंग,घंटी,घुंगरू,झुल,गोंडे,गेरू,बेगड, रंग,फुगे,काकड्या यांनी त्यांची सजावट...मग संध्याकाळी पोळ्यात जाण्याआधी पुजा...पोळा फुटल्या नंतर प्रत्येक घरी पुरण पोळी...त्यानंतर आराम...वर्षभरातील त्यांचा हक्काचा,आनंदाचा अन आरामाचा एकमेव दिवस....पोळा....
.....शेतकर्यांसचा सर्वांगीण विकास करण्याच्या ,उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या उदात्त हेतूने शेतीचे 'आधुनिकीकरण' व 'यांत्रिकीकरण' करण्यात आले आहे.त्यामुळे पशूंची जागा यंत्राने घेतली.'कारण - परिणाम' हा चर्चेचा मुद्दा नाही....पण आनंदाचे चित्र मात्र बदललेले आहे...लहान मोठ्या शहरात 'बैला' ला पाहायला गर्दी होते..आजच्या या चित्राला काय म्हणावे ..???
Friday, August 15, 2014
पुरस्कार...
काही दिवसांपूर्वीचा प्रसंग...खुप दिवसांनी जळगाव ला आम्ही मित्रमंडळी एकत्र जमलो होतो .साहजिकच एम जे तील जुन्या आठवणींनी,उपस्थित असलेल्या,नसलेल्या मित्रांच्या – मैत्रिणींच्या धमाल किस्सानी मैफिल चांगलीच सजली होती.त्या मैफिलीत एका मित्राने तो ‘बाप’ झाल्याची गोड बातमी दिली.मुलाचे नाव काय ठेवावे याबाबत त्याने विषय काढला.आमच्या कडून काही नवीन,विशेष अन वैशिष्टपूर्ण नाव मिळेल ही त्याची अपेक्षा होती.अनेक नावे आम्ही त्याला सुचवली,पण हवे असणारे नाव त्याला त्यातून काही गवसले नाही.शेवटी तो मित्रच म्हणाला “नाहीतर ‘भारतरत्न’ हेच नाव ठेवतो.‘भारतरत्न *** ***’.”त्यावर आम्ही खुप हसलो व त्या नावासाठी मित्राला शुभेच्छा देवून आमची मैफिल आटोपती घेतली....
भारतरत्न पुरस्कारबाबत होणारी चर्चा ज्या दिशेने जात आहे त्यावरुन ‘भारतरत्न’ पुरस्काराला आपण गल्लीतील एखाद्या संस्थेद्वारे हेतूपुरस्कर दिल्या जाणार्या पुरस्काराच्या रांगेत बसवतो आहे की काय हि शंका घ्यायला तेथे बराचसा वाव आहे.एखादा पुरस्कार म्हणजेच कार्याला मान्यता या समाजात रुजू होऊ पाहणार्यार सामाजिक प्रवृत्तीतून पुरस्कारांना आम्ही बाजारपेठेत घेवून आलो आहे.त्यामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्याचे भानही आम्ही ठेवत नाही.
भारतरत्न कुणाला द्यावा हा नेहमीच वाद – विवादाचा विषय राहिलेला आहे.वास्तविक पाहता या महान व्यक्तींचे कार्य एखाद्या पुरस्काराने मोजताच येत नाही.या सर्व व्यक्ती पुरस्कारापलीकडे गेलेल्या असतात.परंतू आमचे राज्यकर्ते राजकारणापलीकडे विचार करताना दिसत नाही,म्हणूनच सरकारची विचारसरणी या व्यक्तींच्या निवडी मध्ये डोकावते हे मात्र उघड सत्य आहे व हे आपल्या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.आपणही अशा सावळ्या चर्चेत त्वेषाने ,चवी ने सहभागी होतो,सज्ज होतो आपल्या आवडत्या तसेच जाती धर्माच्या व्यक्तीला,नेत्याला,महात्म्याला ‘भारतरत्न’ मिळावा ही मांगणी करण्यासाठी....यातून अनेक ‘भारतरत्न’ भारतात निर्माण होतील तुम्हा –आम्हाला प्रेरणा देण्यासाठी..??????
Sunday, August 3, 2014
रम्याविषयी...
काही लोकांमध्ये उपजतच काहीतरी असत कि त्यांना सर्वजण आपला ‘मित्र’ समजतात ...यामध्ये हक्काने बसणारा म्हणजे रम्या ...रमेश होलबोले..अनोळखी व्यक्ती हि याच्याशी बोलेल तर त्यालाही वाटत आपण आपल्या एखाद्या जुन्या मित्रासोबतच बोलतो आहे .हेच तर रम्या च सर्वाधिक महत्वाचे वैशिष्ट...त्याची अन माझी भेट सुध्दा याच थाटात झाली ,पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेल क्रमांक ५ च्या रूम नंबर ३६ मध्ये ..तो आणि मी शेजारी – शेजारी...मी आणि माझा एक मित्र खुप उचापती करत राहायचो .माझ्या रूम मध्ये आमचा एक पत्रकार मित्र पण असायचा. तो दररोज सकाळी फोन करून त्याच्या मैत्रिणीला गुड मॉर्निंग म्हणायचा ,मग काय आम्ही पण त्या मित्रादेखत गुड मॉर्निंग म्हणायचो ,त्यात रम्या हि शामिल व्हायचा .(आता त्या गोष्टीचं हसू अन वाईट वाटतं पण त्या वेळेस मात्र वेगळीच धुंदी होती.)
त्या गुड मॉर्निंग च्या चक्कर मध्ये मात्र रम्या आमच्या खुप जवळ आला .माझ्यात आणि रम्यात दोन – तीन गोष्टी बाबत साम्यता होती ती म्हणजे उशिरा उठणे , ‘जयकर’ ला फारसे न जाणे अन अभिजात कला कृती वर (चित्रपट ,नाटक, पुस्तकं व ललित कला केंद्राच्या मुली ..)तासन तास चर्चा करणे .. ‘ललित कला केंद्र’ हा तर आमच्या खूपच जिव्हाळाचा विषय.आम्ही त्याला गंमतीने ‘खोलीत कला’ असे म्हणायचो ...त्यात थोडीशी वास्तविकता ही होती हे मात्र खर.
मी आणि रम्या दोघेही एमफिल ला सोबतच होतो .रम्याचा एमफिल चा विषयही भव्य – दिव्य अमेरिकन ब्लॅक थिएटर वर .दोघांनाही हॉस्टेल प्राप्त ..आणि दोघांच्याही रूम वर पॅरासाइड चा भरणा ..धमाल मज्जा यायची त्या दिवसांमध्ये ..दर रविवारी सायंकाळी मेस बंद असायची मग त्या दिवशी खिचडी ...जास्तीचे पैसे असल्यास चिकन बिर्याणी असा आमच्या दृष्टीने फस्ट क्लास बेत ...मग रात्री रम्या च्या पीसी वर चित्रपट ...चित्रपटांना मात्र विषयाचे बंधन नव्हते . या सर्व गोष्टींमुळे रम्या अधिक समजत गेला ,म्हणावं तर अधिकच ‘कळत’ गेला .
मध्यंतरीच्या काळात हॉस्टेल ची मुदत संपली .विद्यापीठ तरी काय करणार ..आठ – दहा वर्षापासून विद्यार्थी राहतात तिथ .या हॉस्टेल मधून त्या हॉस्टेल मध्ये ,एका रूम मधून दुसर्याव रूम मध्ये पॅरा साइड असा प्रवास ..त्यासाठी मी पुणे विद्यापीठाला वैयक्तिक धन्यवाद देतो ..अनेक पॅरा साइड घडविले या विद्यापीठाने ..त्याचे मोल नाही ..काही विद्यार्थ्यांना मात्र याची किंमत नाही .एकाने मागणी केली होती म्हणे कि जे दहा वर्षापासून विद्यापीठात राहतात त्यांची विद्यापीठाने कायम स्वरुपी व्यवस्था करावी .खरे – खोटे माहीत नाही ..विद्यापीठाला खुप अनुभवले होते , म्हटले विद्यापीठा बाहेरची दुनिया अनुभवावी...म्हणूनच आम्ही ठरविल आता विद्यापीठाच्या बाहेर राहायचं ....जवळ खुप पैसा होता अस नव्हतच मुळी ...पण बाहेर राहण्याची इच्छा मात्र होती .पाच ते सहा जण एकत्र येऊन महिन्याला ४००० ते ५००० पर्यन्त फ्लॅट करायचा ..फ्लॅट वरच जेवण ..म्हणजे एकाच्या वाटयाला १२०० ते १५०० ...मग फ्लॅट ची शोधाशोध सुरू झाली .बर फ्लॅट विद्यापीठाच्या जवळ असणार्याय एरिया मध्येच असण सोयिस्कर होणार होते म्हणून सांगवीत शोध घेतला ..पण तेथे मात्र काही जुळून आले नाही . शेवटी मोठ्या प्रयत्नाने सोमेश्वर वाडीत फ्लॅट मिळाला आणि फ्लॅट चा शोध एकदाचा तो थांबला .म्हणण्यासाठी आम्ही विद्यापीठाच्या बाहेर राहत होतो पण संपूर्ण दिवसभर डिपार्टमेंट ,अनिकेत ,ओपन , आदर्श अन जयकर ..फक्त झोपण्यासाठी फ्लॅट वर...याच काळात रम्या च्या व माझ्या नेट – सेट च्या वार्यार सुरूच होत्या ..शेवटी सुटलो एकदाचे आम्ही त्या परिक्षेतून ...दोघेही एकाच परिक्षेत पास झालो .
रमेश होलबोले...उंची ५’७ ,वर्ण काळा ..दाढीचे खुंठ म्हणता येणार नाही अशी संपूर्ण दाढी..अंगावर सुती कुर्ता ,कधी कधी टी –शर्ट ..खाली जीन्स ..स्ट्यलिस्ट पण त्यातून स्वतचे हसे होणार नाही ...एखादया कलेला जोपासणार्या५ कलासक्त लोकांसारखा ...बोलतांना (समोरचा व्यक्ती पाहुन ) अवगत केलेली पुणेरी मराठी...ओळख सांगण्याची पद्धत ,थोडेसे हसून “मी रमेश होलबोले..गोडबोले नाही होलबोले..गूगल वर सर्च कराल तर फक्त रमेश होलबोले च मिळेल’’ अस काहीस अभिमानाने सांगणे ...पुण्यात राहून पुणेरीपण आत्मसाद केलेला ...शॉर्ट फिल्म ,दिवाळी अंक ,फिल्म फेस्टिवल अशा निमित्ताने काहीतरी चळवळ करित राहणारा रम्या...मित्रांमध्ये संपूर्ण वातावरण ‘बिनधास्त’ करणारा रम्या....
जॉब साठी पुण सोडाव लागलं ...पण आठवणीतील पुण कस सोडता येणार .पुण्याने काय दिले यापेक्षा पुण्याने काय नाही दिले हेच मी स्वतला विचारतो .मुलासारखे प्रेम करणारे गुरु...जिवा भावाचे मित्र ...समृद्ध करणारे अनुभव ...हीच माझी पुण्यातील पुंजी ...माझ्या आठवणीतील पुण्याला सोबत घेऊन मी नागपूर ला निघालो होतो ...नवीन वातावरण ..नवीन मित्र ...नवीन अनुभव अनुभवण्यासाठी .....पण एक सांगू मी अजूनही त्यात रम्या शोधतोय .....
Thursday, July 31, 2014
आठवणीतील काही ....
पुण्याला दुसरी भेट झाली ती एमबीए सीइटी च्या निमित्ताने ...एमबीए बद्दल काय बोलावे...कचरा केला आहे सीस्टीम ने ...अभ्यासक्रम तसा चांगला पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे (चुकीचा हा शब्द वापरला नसता तरी चालले असते ) त्याची पुरती वाट लागली.गल्ली बोळात एमबीए चे कॉलेज झाले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. विद्यार्थ्याचा बोर बार्याी...पण त्यावेळेस मात्र क्रेझ होती त्या फसव्या दुंनियेची..आम्ही विद्यार्थी स्वप्न रंगवित होतो त्या कोर्पोरेड वल्ड चे ..आता मात्र वाटते बर झाले एमबीए केले नाही ..
....पोहचलो पुण्यात ...म्हटलं आता तरी आवडेल पुणे...कारण पुण्यातील पहिल्या भेटीचा अनुभव फारसा काही चांगला नव्हता...भारती विद्यापीठ सेंटर होत एक्झॅम च ...मी मात्र पुणे विद्यापीठात मित्राकडे थांबलो होतो .मित्रानेच भारती विद्यापीठात कसे जायचे ते सांगितले..आधी स्वारगेट ..तेथून कात्रज ..अन शेवटी भारती विद्यापीठ .भव्य दिव्य असे भारती विद्यापीठाचे ते गेट ..चकाचक असे भारती विद्यापीठ (पतंग रावांची कृपा दुसरे काय )...एकदाची सुरू झाली परीक्षा ..काही वेळ डोक घासून पाहिले पण प्रश्नाच अन वेळेचे गणित जमत नव्हते.मग मात्र ठरविले आता फक्त गोल करायचे बस.. पंधरा मिनिटात सर्व गोल करून मोकळा झालो ..मध्यंतरी पेपर सोडविताना एक – दोन मुलींनी एक्सामिनर ला सफाईदार इंग्लिश मध्ये काहीतरी विचारले ..मी म्हटलं आपले मराठी ही एवढे सफाईदार नाही आणि ह्या इंग्लिश मध्ये फडफड करताहेत..अशा पुण्यात कसा निभाव लागेल आपला ...मनात एक निराशा..
एकदाचा संपला पेपर..आलो परत पुणे विद्यापीठात मित्राकडे..मग त्याच्या सोबत जेवण ...गप्पागोष्टी ..आणि त्यानंतर रात्रीचा जळगाव कडे परतीचा प्रवास ...म्हटलं या भेटीतही पुण काही ‘आपल’ झाल नाही ....
आठवणीतील काही....
एकदा कुठेतरी एकले होते..आजकाल ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे चरण तरी उरले कुठ ,परंतु सर मी मात्र याबत खरच अभागी नाही. पुणे, विद्येचे माहेरघर.जळगावला शिकत असताना एकदा एका कामानिमित्त पुण्याला आलो .ती माझी पुणे शहराशी पहिली भेट आणि या पहिल्या भेटीतच मी गांगरून गेलो .पुण्यात त्या दिवशी पुणेरी पाऊस पडत होता .हो पुणेरी पाऊस च .येथील पाऊस पण पुणेरी लोकांसारखा वैशिष्ट्यपूर्ण....पडतो न पडतो असा सतत अन रिमझिम ...मग काय त्या रिमझिम पावसातच याला विचार – त्याला विचार असे करत धावपळत पीएमटी मधून चिंब झालेल्या पुण्याचे दर्शन. गच गर्दीने भरलेली ती पीएमटी ,त्यात सर्वच वयाचे प्रतिनिधित्व करणारे पुणेरी प्रवासी पण विशेष भावल्या अर्थातच पुणेरी तरुणी. मुळा – मुठे वर असणार्याि पूलांवरून ती पीएमटी किती वेळा गेली मलाही माहीत नाही .सर्वच पूल एकसारखे वाटत होते .त्यामुळे माझ्या गोंधळात अधिकची भर झाली .
एकदाचे काम संपले अन पुण्याला हात जोडूनच रात्रीच्या रेल्वेने जळगावच्या दिशेने प्रस्थान केले ते पुण्यात परत न येण्यासाठीच .
सकाळी सकाळी जळगावला पोहचलो . रेल्वे स्टेशन वरून थेट एमजे होस्टेल च्या रूम नंबर 12 मध्ये.. सारे मित्र अजुनही बिछ्याण्यात पडलेले होते .त्यांनी विचारले “कस वाटलं रे पुण” .मी म्हटलं “जाऊ द्या ना यार ....??????? करून आलो पुण्यात ...”
खरच पुणे अस आहे का ? नंतर ज्या शहराच्या प्रेमात मी पडलो ,जे शहर माझ दुसरे ‘घर’ झाले ,अस माझ पुणे , आपले पुणे ....शिवाजी महाराज,पेशवाईचा इतिहास सांगणारे पुणे..स्वातंत्र चळवळीला आपल्या योगदानाने तेवत ठेवणारे पुणे ..फुले ,टिळक ,सावरकर ,चाफेकर ..अश्या अनेक विभूतींच्या स्पर्शाने पावन झालेले पुणे ..मराठी भाषेला समृद्ध करणार्या, सरस्वतांचे अन व्यासंगी वाचकांचे पुणे.’पुणे तेथे काय उणे’ मराठीत या म्हणीची भर घालणार पुणे...कलेला दाद देणार्या कला सक्त लोकांचे पुणे ...आपली संध्याकाळ बालगंधर्व ,गणेश कला ,टिळक मध्ये घालविणार्याच बौद्धिक लोकांचे पुणे..पेन्शनरांचे पुणे ..गल्ली पासून दिल्ली पर्यंत घडणार्यार घटनांना साद – प्रतिसाद देणारे पुणे ..’सांकृतिक राजधानी’ ,‘विद्येचे माहेरघर’ हा वारसा अभिमानाने जपणार पुणे ...रूपाली पासून चितळे पर्यंत आपल्या चवीच्या बढाया मारणार पुणे ...सदाशिव पेठी खोचक लोकांचे पुणे ..बुधवार पेठेबाबत आंबट चर्चा करणारे पुणे...झेड ब्रिज,सारस बाग ,पर्वती ,वेताळ टेकळी ,एलिस गार्डन ..मध्ये एकमेकांना मिठीत घेऊन बसणार्यार तरुण –तरुणींचे पुणे..आयटी ने झपाट्याने बदलत जाणारे पुणे...परंपरा आणि नाविन्य यांची सांगड घालणारे पुणे...स्वप्नं पहायला,धडपड करायला शिकविणारे पुणे..कितीतरी रुपे सांगता येतील या शहराची ...
पुणे शहर तुमचा राग करत ..द्वेष करत ...पण खर सांगु यापेक्षा ते तुमच्यावर अधिक प्रेम करत ...मी मागे वळून पाहतो आणि स्वतला विचारतो की, मी पुणेरी का होऊ शकलो ...त्याच उत्तर तीनच शब्दात सापडते सर ‘तुमचे अधिकच प्रेम’.
Tuesday, July 15, 2014
ब्लॉग लिहण्याची प्रेरणा तशी सचिनची...
ब्लॉग लिहण्याची प्रेरणा तशी सचिनची....आमचे लिखाण बंद झाले अन सचिन ने लिखाण सुरू केले ते पण एकदम मनाला भिडणार,वास्तवतेच्या जवळच...पुणे विद्यापीठातील काही आठवणी....म्हणून कागदावर उतरवून काढल्या त्याने....अन आम्हाला त्याच्या लिखाणातील वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव झाली. त्याचे बोलणे अन लिहणे एकच झाले म्हणून त्याच्या लिखाणाला वास्तवतेची किनार लाभली आणि त्यातुन व्यक्त झाले आम्ही अन त्याने अनुभवलेले अनुभव....काटेरी तरी पण सोनेरी अनुभव....ते अनुभव ‘वाटता’ येतील पण ‘घेता’ येणार नाही,म्हणूनच त्याचे लिखाण आम्हाला हवेहवेसे वाटत आहे...त्यासाठीच त्याच्या लिहत्या हाताला खूप खूप शुभेछा....
Subscribe to:
Posts (Atom)