Monday, December 8, 2014
जयकर....
नागपूर ला येऊन खूप दिवस झाले तरी नागपूर विद्यापीठाला अजूनपर्यंत भेट दिली नव्हती. काल परवा प्रथमच नागपूर विद्यापीठात गेलो होतो.प्रथम भेटीत प्रेमात पडाव अस नागपूर विद्यापीठ मुळीच नाही,कारण ही त्याला सहज सांगता येईल.विद्यापीठाचे विविध विभाग शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहे म्हणजे एक एकीकडे अन दुसरा भलतीकडे...विद्यापीठाची मेन बिल्डिंग रविनगरच्या अमरावती रोड ला...लायब्ररी नॉर्थ अंबाझरी रोड वर...परिक्षा विभाग भारत नगर च्या एलआयटी मध्ये..तर विद्यार्थी हॉस्टेल रविनगर स्कोअर ला...त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.वेळ ,पैसा ,श्रम खर्च झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तोंडून न कळत विद्यापीठाबाबत म्हणजेच व्यवस्थेबाबत वैदर्भिय अपशब्द बाहेर येतात.(कधी कधी आपण अपशब्द उच्चारण्या पलीकडे काही करू शकत नाही....)
एका मित्राच्या नेट परीक्षेच्या फॉर्म चे सबमिशन करणे हे माझ्या विद्यापीठ भेटीच निमित्त होत.या विद्यापीठाचा तीन चार ठिकाणाचा तमाशा पूर्व माहित असल्यामुळे आणि आपली गैरसोय टाळावी म्हणून मी अगोदरच माझ्या मित्रांकडून फॉर्म नेमक्या कोणत्या ठिकाणी सबमिट करावा याची माहिती घेतली होती. त्यांनी सांगितल्यानुसार ‘भाऊसाहेब कोलते लायब्ररी’त फॉर्म जमा करण्यासाठी जायचं होत.चौकातील एका रिक्षावाल्या काकांना म्हणालो “भाऊसाहेब कोलते लायब्ररी जाना है I ” क्षणभर विस्मयाने माझ्याकडे पाहत त्यांनी मलाच विचारले “कहा है?” “झाशी राणी चौक के आगे..”... मी. “चालीस रुपये लगेंगे”...काकांनी रिक्षा सुरू करत भाडे वाक्य माझ्या कानावर फेकल.मी हो म्हणत.. आमची रिक्षा भाऊसाहेब लायब्ररी चा शोध घेत झाशी राणी चौकाकडे धावू लागली.
मध्यंतरी काकांच्या प्रतिप्रश्नाने मला उमजले होते की,या काकांना सुद्धा ही लायब्ररी माहित नाही.परंतु काकांना हातच ग्राहक गमवायच नव्हतं आणि माझ्या जवळही वेगळा पर्याय नव्हताच.तीन चार व्यक्तींकडे विचारपूस करत करत शेवटी आम्ही मोठ्या कष्टाने ‘भाऊसाहेब कोलते लायब्ररी’ शोधून काढली आणि सापडली एकदाची असे भाव दोन्हींच्या चेहर्या वर प्रगट झाले.पैसे देतांना रिक्षावाले काका म्हणाले “अगलेसे यूनिवर्सिटी लायब्ररी बोलना...भाऊसाहेब कोलते को कोई पहेचानता नही...”
डॉ.व्ही.बी.उर्फ भाऊसाहेब कोलते...नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू...2000 मध्ये नागपूर विद्यापीठाच्या लायब्ररी ला त्यांचे नाव देण्यात आले परंतु अजूनही त्यांच्या नावाने ती लायब्ररी ओळखल्या जात नाही हे नागपूर विद्यापीठाचे दुर्दैव म्हणावे लागेल....
‘जयकर’ ला सोबत घेऊनच नवीन विद्यार्थी शक्यतो पुणे विद्यापीठात प्रवेश करीत असतात,म्हणजे ‘जयकर’ हे नाव त्यांना अगोदरच कोठून तरी माहित झालेल असत.म्हणूनच जयकर ला पाहण्याची उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात दडलेली असते....पुणे विद्यापीठाच भव्य अस ते गेट..परंतु अवती भवती च्या गर्दीत लपलेल..बाहेरच बाजूला पोलिस चौकी..गेट च्या एका बाजूला विद्यार्थी सुविधा केंद्र..आधी तेथे पीआरओ चे राहते घर होते..तर दुसर्याप बाजूला पीएमटी चा बस स्टॉप...परंतु खरा गोंधळ होतो ते समोरील डाव्या,उजव्या बाजूचे दोन रस्ते पाहिल्यावर...तेथे कोणता रस्ता धरावा हा प्रश्न निर्माण होतो.उजव्या बाजूने हॉस्टेल ऑफिस,नवीन बांधलेल कॉमर्स डिपार्टमेंट...क्लास रूम कॉम्प्लेक्स ...हेल्थ सेंटर ..गणित विभाग...समोरच ओपेन कॅंटीन..खेर वाड्मय भवन करत विद्यापीठाची मेन बिल्डिंग...तर डाव्या बाजूने म्हणजेच पोलिस चौकी कडून पर्यावरण शास्र..बॉटनी..झुऑलजी डिपार्टमेंट करत जयकर च्या भव्य बिल्डिंग चे दर्शन होते.जयकर ला जाण्यासाठी हाच मार्ग सोईचा आहे.
‘जयकर’ ला पहिल्यांदा भेटल्यावर कोणत्या भावना मनात येतात?प्रत्येक विद्यार्थ्यासाठी याची उत्तरे निरनिराळी...जयकर ची परिभाषा कशी करावी ?याचेही उत्तरे प्रत्येकासाठी वेगवेगळीच...जयकर फक्त ‘ग्रंथालय’ आहे का ? की पाचशे-हजार विद्यार्थ्यांना सामावून घेणारी अभ्यासिका आहे?असे प्रश्न जयकर च्या विद्यार्थ्यासमोर उपस्थित केले तर त्याची येणारी उत्तरे जयकर ला ‘ग्रंथालय’ वा ‘अभ्यासिका’ म्हणून सीमित करू शकत नाही.एवढ जयकरच अन येथील विद्यार्थ्यांच भावनिक नात निर्माण झालेल असत.म्हणूनच येथे येणार्यान प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जयकर फक्त ग्रंथालय किंवा अभ्यासिका राहत नाही तर त्यांच्या भावविश्वातील एक ‘श्रद्धास्थान’ असत...
विद्यापीठात आलेला प्रत्येक विद्यार्थी ध्येय,स्वप्न जवळ बाळगून असतो.विद्यापीठातील भरावलेल वातावरण..नवीन नवीन अभ्यासाचा जोश..त्याला जयकरच्या अभ्यासी वातावरणाची सोबत...म्हणूनच विद्यार्थी जागेसाठी सकाळी सहा पासूनच जयकर ला गर्दी करतात.सुरवातीला सार काही सुरळीत सुरू असत म्हणजे अभ्यास एके अभ्यास..फक्त जयकर आणि आपण..कारण कुणी फारसं परिचयाच नसत.परंतु कालांतराने ओळखीचे चेहरे होतात..चेहर्यां ची ओळख होते आणि येथूनच जयकर ची व आपली ‘दोस्ती’ जुनी होत जाते...जयकर खर्यार अर्थाने कळत जाते...विद्यार्थ्यांचे अनेक प्रकार नकळत लक्षात येतात..सकाळ पासून रात्री पर्यंत अभ्यास करणारे विद्यार्थी...एक वेळच जेवणारे विद्यार्थी...सकाळी जयकरला बॅग ठेवल्यावर रात्रीच बॅग घेऊन जाणारे विद्यार्थी...अधून मधून जयकर ला भेट देणारे विद्यार्थी...सुरवातीला आपल्या ‘वर्गमैत्रिणीची’कालांतराने ‘गर्लफ्रेंड’ची जागा सांभाळणारे विद्यार्थी...गर्लफ्रेंड शोधणारे विद्यार्थी...(आमच्या एका मित्राच्या मते फुकट पेपर वाचणारे विद्यार्थी...) डाव्या उजव्या मताचे...समाजवादी..हिंदूत्ववादी ...फक्त नेट –सेट करणारे..फक्त नेट देणारे..फक्त सेट देणारे...तर काही फक्त यूपीएससी करणारे...काही फक्त एमपीएससी करणारे ...बहू अधिक दोन्ही चान्स घेणारे..काही फक्त बँकिंग चाच अभ्यास करणारे असे एक ना अनेक...यादरम्यान आपल एक आखीव –रेखीव टाइम टेबल तयार होत जात.सकाळी ६-७ ला जयकर ला भेट...बॅग ठेवून ‘अनिकेत’ मध्ये चहा-नाश्ता,९ वाजता पेपर साठी परत अनिकेत कडे..मग पेपर वाचन..अभ्यास...१२.३० ला जेवणासाठी जयकर च्या खाली..१.३० ला परत जयकर..थोडीशी झोप...परत अभ्यास...सायंकाळी ५ वाजता चहासाठी ‘अनिकेत’ किवा ‘ओपेन’ कडे...दरम्यान ठेका घेतल्यासारखे गल्ली पासून दिल्लीच्याही पुढील जागतिक विषयावरील त्या विषयातील तज्ञ समजून चर्चा..६ ते ८.३० जयकर..मग रात्रीच जेवण...परत रात्री ११पर्यंत जयकर...यातून आपल्यातील बदल आपल्यालाच कळत जातो.
जयकर ची स्वतची अशी काही वैशिष्ट्ये आहे.काही विद्यार्थ्यांना जयकर लवकर पावत.काही विद्यार्थ्यांना जयकर लवकर पावत नाही किंवा पावतच नाही.अस असल तरी जयकर कधीही कोणत्याही विद्यार्थ्यांची ओंजळ रिकामी ठेवत नाही.जीवन जगण्यासाठी विविध समृद्ध अनुभवाची शिदोरी त्यांच्या सोबत देतच असते.ती शिदोरी आपल्याकडून कोणी हिरावून घेवू शकत नाही म्हणूनच येथील विद्यार्थ्यांच्या जीवनात जयकर ला ‘पंढरी’ चे स्थान आहे.
आजही एमपीएससी,यूपीएससी,नेट-सेट चे निकाल लागतात तेव्हा विद्यार्थी एकच विचारतात, ‘जयकर’ चे किती विद्यार्थी पास झाले.यातच ‘जयकर’ चे ‘स्वातंत्र अस्तित्व’ व ‘स्वातंत्र ओळख’ सामावली आहे. याठिकाणी प्रत्येक विद्यार्थी पुण्यात येवू शकणार नाही आणि ‘जयकर’ चा लाभ घेवू शकणार नाही ही बाब सुद्धा आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे म्हणूनच महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये ‘जयकर’ सारखी वातावरण निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे॰ येथे ‘जयकर’ ची थोरवी सांगणं हा उद्देश मुळीच नाही.परंतु इतर विद्यापीठांमध्ये आपण ‘जयकर’ निर्माण करू शकलो नाही,ही खंत मात्र नक्की आहे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment