Tuesday, January 6, 2015

दुर्गभ्रमण गाथा....

एखाद्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट न देता त्या ठिकाणाला कडकडून भेटता येईल का?तुमच्या आमच्या लेखी या प्रश्नाच ‘नाही’ असच उत्तर असेल.परंतु ज्या वाचकांनी ‘दुर्गभ्रमण गाथा’ अनुभवलेली आहे ते मात्र या प्रश्नाला ‘दुर्गभ्रमण गाथा एकदा तरी हाती घ्या’एवढ्याच शब्दात उत्तर देतील!!! नुकतच गो.नि.दांडेकरांच ‘दुर्गभ्रमण गाथा’ वाचुन हातावेगळे केले. ‘हातावेगळे केले’ या शब्द प्रयोगापेक्षा ‘हातावेगळे झाले’ म्हणणे अधिक न्यायदर्शक...कारण दुर्गभ्रमण गाथेत गड किल्ल्यावरील शब्दांची नजाकत ऐवढी सुंदर आणि अप्रतिम की पूर्ण वाचल्याशिवाय स्वस्थता नाही... ४५० पानांची ही दुर्गभ्रमण गाथा...गाथेत गोनिंदा आपल्या सिद्धहस्त लेखणी सामर्थ्याने शिवाजी राजांचा वारसा सांगणार्याग किल्ल्यांच जिवंत चित्रण डोळ्यासमोर उभ करतात.या प्रत्येक किल्ल्यानं आपल ऐतिहासिक महत्व,वैशिष्ट अन वेगळेपण राखून ठेवलय.... किल्ल्यांच्या अवतीभवतीची समाज संस्कृती...त्या किल्ल्यांची ऐतिहासिक-भौगोलिक पार्श्वभूमी...किल्ल्यांला जाणार्यात धुळवाटा,कडा-कपारी,घाट,खिंडी...रस्त्याने लागणारा ऋतु प्रमाणे कधी मुसळधार पाऊस,कधी रन-रनत ऊन तर कधी बोचरी थंडी अन त्यासोबत गर्द धुक ही...पर्वतरांगांच्या दर्याा खोर्या तुन वाहणार्या् नद्या-नाले आणि त्यांच तहान भागविणार,थकवा दूर करणार शीतल जल...जंगलातील साद घालणारे पशू पक्षी...किल्ल्यां वरून नजरेत भरणारा विस्तीर्ण प्रदेश, जल अस्तित्व दाखविणार्यां नद्या-धरणे...ढगांच्या कुशीत होत जाणारा सूर्यास्त...नक्षत्रांच्या संगतीत किल्ल्यावर घालवलेली चांदणी रात्र...भल्या पहाटे हळूहळू होत जाणारा सूर्योदय...किल्ल्याच कल्पनेपलीकडील भव्य दिव्य प्रवेशद्वार...पाण्यांची हौद,तलाव,खोगिर,तोफ,दारूगोळा,गुढ असणारी भुयारं...किल्ल्यांची तटबंदी,बुरूज,पडके चौथरे,ढासळलेला राजप्रासाद,भग्न अवस्थेतील राहती ठिकाण..आपल्या पूर्वजांच्या समाध्याचे खिन्न करणारे अवशेष....वृक्षछायेत असणारी देऊळे अन त्यातील पुरातन मुर्त्या...आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधतात.खरच गोनिदांच्या लेखन शैलीला तोड नाही. ऐकिव नसलेला शब्द गवसणे अन तो अलगत वेचून घेणे यातील समाधानाची अनुभूती भ्रमण गाथेत ठिकठिकाणी मिळत जाते. ‘भराटवारा’, ‘मेघडंबरी’, ‘गोमेद’, ‘खारवा’, ‘कडाबिनी’, ‘एलोरी’......अशा कितीतरी शब्दवैभवांनी भ्रमणगाथा सजलेली आणि समृद्ध झालेली आहे.मला यात सर्वात भावलेला शब्द तो ‘कुमारी वाटा’. .... “राजुर ला आम्ही इगतपुरी-संगमनेर महामार्ग सोडला,अन त्या कुमारी वाटेला लागलो.कुमारी वाट म्हणजे जिथवर नागरी संस्कृतीचा संस्पर्श अद्यापवरि झाला नाही.जिथवर खाली पडलेल्या शेणाच्या पोटयाचही मोल घ्यायचं असत ही नागरी शहाणीव अजून पोंचली नाही.’’ गोनिदांनी कुमारी वाटेच केलेले हे वर्णन त्यांच्या निरीक्षण दृष्टीची एक छोटीशी झलकच... दुर्गभ्रमण गाथा’ आपल्या झोळीत काय देते? आजच्या व्यवहार्थ जगात नफ्या-तोट्याच्या तराजू तील हा एक महत्वाचा प्रश्न.धावपळीच्या या आयुष्यात आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो,मजा मस्ती करतो,आनंद लुटतो अन परत येतो परंतु यापलीकडे त्या ठिकाणचा इतिहास,ते ठिकाण,त्या ठिकाणची माणस आपल्याशी काहीतरी बोलू पाहताहेत,हे आपण लक्षातच घेत नाही म्हणूनच एखाद्या ठिकाणाशी कस वागाव,त्याच्याशी हितगुज कशी करावी याचा परिपाठ....त्या ठिकाणच्या लोकांचं जगणं अनुभवण्याची शिकवण....आपल्या पूर्वजांची आठवण,त्यांनी आपल्या हाती दिलेला हा अमूल्य ठेवा,त्या ठेव्याची जपवणूक करण्याच भान....राजांनी स्वराज्या साठी उपसलेले कष्ट..राजांची प्रेरणा,स्फुर्ती,दूरदृष्टी... गोनिदांची राजांप्रती,किल्ल्यांप्रती असणारी समर्पित वृत्ती....आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैशांच्या बाजारात विकत न मिळणारा अभिजात कलाकृतीचा ‘निर्लेप अन निखळ आनंद’....या सर्वांनी ‘दुर्गभ्रमण गाथा’ आपली झोळी ‘श्रीमंत’ करते... ‘पाणी’ सुद्धा विकत मिळणार्या् या दुनियेत अजून काय हवे..?????

No comments:

Post a Comment