Thursday, April 28, 2016
20 रुपयात अख्या महाराष्ट्र खिशात....
20 रुपयात अख्या महाराष्ट्र खिशात....
रात्रीचा 1 वाजलेला.एसटी औरंगाबाद बसस्थानकात येऊन थांबलेली...मी डोळ्यात झोप धरून आहे.त्याच अवस्थेत एका वाक्याने माझ्या झोपेलाही ढील दिली.वाक्य होत ...प्रवासी बंधुनो लक्ष द्या...20 रुपयात अख्या महाराष्ट्र खिशात बसवा....मी म्हटलं हे काय नवीन भलतच...त्याच कुतुहलाने झोपेला आवरत डोळे उघडले.मग संपूर्ण चित्र स्पष्ट झाले.एक मनुष्य हातात 5 -10 डायर्या घेऊन डायरी विषयी माहिती सांगत होता...डायरीत मुख्यमंत्र्या पासून प्रत्येक मंत्रांच्या कार्यालयाचे दूरध्वनी,मंत्रालयातील प्रत्येक विभागाचे दूरध्वनी क्रमांक,महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी,एसपी कार्यालय,सरकारी हॉस्पिटल चे पत्ते व दूरध्वनी क्रमांक,प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांचे पिनकोड,एसटीडी कोड...शिवाय जिल्ह्यातील तीर्थस्थळे, मंत्र्यांची नावे,त्यांचे खाते,जिल्ह्याचे पालकमंत्री यासारखे सामान्य ज्ञान ही...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे A to Z अशी पत्ते व दूरध्वनी साठी पानांची रचना...अस बरच काही... सामावलेल होत. हे सार सांगितल्यावर त्याची ‘पंचलाइन’...20 रुपयात अख्या महाराष्ट्र...ही एका विशिष्ट आवाजात कानावर पडतच होती.अनेकांनी त्याच्या या जाहिरात कलेच कौतुक करत त्याच्याकडून डायर्याह विकत घेतल्या आणि मी मात्र त्याच्याकडून काही प्रश्न फुकट घेतले....
‘थेअरी’ व ‘प्राक्टिकल’ मध्ये प्रचंड अंतर ठेवणार्याप आपल्या शिक्षण व्यवस्थेतील कोणत्या महाविद्यालयात तो एवढी चांगली जाहिरात कला शिकला असेल? दुसर्याल क्षणाला वाटले हा एक निरर्थक प्रश्न...म्हटलं याचा शोध घेणेही व्यर्थ... ‘जीवन’ नावाच्याच महाविद्यालयान त्याला हे शिकविले असेल.परिस्थिती माणसाला शिकविते हे खरच...आणि हेच त्याच उत्तर. आपणच विचारत जावे प्रश्न अन आपणच शोधावी किंवा द्यावीत उत्तरे... ‘परिक्षार्थी’ आणि ‘उत्तरार्थी’ एकच...ही एक वेगळीच परीक्षा...हा एक पाठशिवणीचा खेळ...
मघाशीच मोबाइल मध्ये डोकावलो होतो.वेळ रात्रीचा एक...परत एक विचार...याच्या घरी बायको –पोर झोपलेली असणार..हा त्यांच्यासाठी ,हितभर पोटासाठी रात्रीचा संघर्ष करीत असेल..मग रात्रीचा दिवस करणारे पुण्यातील रिक्षावाले,रात्रपाळी करणारे कामगार,गोरखा,सेकूरेटी गार्ड,दिवसा वीज नसल्याने रात्री पिकांना पाणी देणारे शेतकरी डोळ्यासमोर येत गेले. सार जग झोपलेल..आणि यांचा मात्र रात्रीचा दिवसासाठी एक संघर्ष...पोटाची खळगी भरण्याची ही धडपड...मग याला पांढरपेशा समाजाच्या भाषेत ‘कष्ट’ म्हणायचे कि त्यांची ‘अगतिकता’...हा परत एक प्रश्न... पण हे कोण समजून घेणार ? आणि कशासाठी समजून घेणार ? जाणिवाच हरवलेल्या समाजासाठी हे सारे निरर्थक प्रश्न...आपणही त्याच गर्दीतले...पण आपण विचार तरी करतो त्यांच्याबद्दल ...परंतु फक्त विचार करून काय फायदा ?....हा परत एक प्रश्न. हे पण खरंच. या प्रश्नाच उत्तर आपल्याकडे नाही...आपली उत्तरपत्रिका कोरीच आहे....
Subscribe to:
Posts (Atom)