Tuesday, October 29, 2019
पुंडलिक भाऊ..
पुंडलिक भाऊ.....
धामणगांवातील राहाटगाळ्याच्या व्यस्ततेत एरवी पुंडलिकभाऊ कुणाच्या गावीही नसतो. मात्र उन्हाळा लागला की अनेकांना पुंडलिक भाऊची आठवण होते. दरवर्षी उन्हाळ्यात त्याचा विषय काढला जातो आणि सहजच त्याचा व्यवसाय,त्याचा चांगुलपणा,त्याची मुलं,त्या मुलाचं त्याच्यामुळे झालेलं भलं या गोष्टी आपोआप चर्चेत येतात. पुंडलिक भाऊ आता साठी त झुकलेला आहे. स्थूल शरीरयष्टी,नेहरू शर्ट, पायजमा, पायात स्लीपर आणि डोक्यावर गांधी टोपी,खांद्यावर बागायती रुमाल या पलीकडे दुसरा पेहराव नसणाऱ्या आणि सतत धावपड करणाऱ्या पुंडलिकभाऊला मी लहानपणापासून पाहत आलो आहे. तो साठीत असूनही सारं गाव त्याला 'अरे तुरे' ने हाक मारत आलं आहे. लहान मुलगाही "काय पुंडलिक भाऊ कसा आहे?" असं त्याला म्हणू शकतो एवढं सहज नातं त्याचं गावाशी आहे. कदाचित त्यासाठी त्याचा स्वभाव कारणीभूत असावा.
धामणगांवच्या बस स्टॅन्ड ला धरूनच पुंडलिकभाऊची एक छोटीशी आजूबाजूला लाल रंगाची झालर लावलेली चहाची टपरी होती. परंतु उन्हाळ्यात मात्र तो चहाच्या जागी थंडगार मलाई लस्सी, आइसस्क्रीम,ताक ठेवायचा. बसायला लाकडी काळपट मजबूत दोन बाक, दोन टेबल, टेबलावर पाण्याने भरलेले दोन तीन मग, ग्लास. ट्रे मध्ये चार काचेचे ग्लास, एक-दोन भांड्यात लस्सीचे दुधजन्य साहित्य, साखर. गल्ला म्हणून बाजूला ठेवलेली एक छोटीशी लोखंडी पेटी,कोपऱ्या मध्ये गोणपाटात बर्फाच्या लाकडी भुसा टाकलेल्या चार दोन लाद्या आणि त्याला फोडण्यासाठी एक टोच्या हे त्याच व्यावसायिक भांडवल. त्याच्याकडे साधनांची कमतरता होती तरीही धामणगावच्या उन्हात लाही लाही करणारा जीव त्या थंडगार पेयांनी तो तृप्त करायचा. म्हणूनच उन्हाळ्यात पुंडलिक भाऊची आठवण होते, ते याच विशेष कारणाने.
माझी शाळा बस स्टॅन्डच्या बाजूलाच होती. बस स्टॅन्ड ची रेल चेल शाळेतून दिसायची. मी सातवीत असतांनाचा हा प्रसंग. एका दिवशी दुपारच्या सुट्टीत आम्ही मुलं बस स्टॅन्ड कडे गेलो असता पाणी पिण्यासाठी पुंडलिक भाऊच्या टपरीत घुसलो. पुंडलिक भाऊ आमच्याकडे पाहत म्हणाला, "लस्सी पिणार का पोरांनो".
"आमच्याकडे पैसे नाहीत"
"तुम्हांला कोण मागते पैसे ,जेव्हा आले तेव्हा देसाल"
असं म्हणत पुंडलिक भाऊने चार हाफ लस्सीचे ग्लास आमच्या हातात दिले. आम्ही आश्चर्य चकित होऊन एकमेकांकडे पाहत त्या थंडगार लस्सीचे ग्लास फस्त केले. अश्या अनपेक्षित धक्क्याची हि पुंडलिक भाऊची आणि माझी पहिली भेट. नंतर तो या- ना त्या कारणाने भेटत राहिला, लस्सीचा आग्रह करीत राहिला. त्याचा हा आग्रह माझ्यासाठी तसेच गावकऱ्यांसाठी नवीन नव्हता. आजही धामणगांवात म्हटलं जाते, पुंडलिक भाऊ जिकडे नजर टाकेल तिकडे त्याची उधारी आहे,एवढ्या लोकांना त्याने चहा,लस्सी वा आइसक्रीम उधारीवर दिली आहे. उधारीवर तो अनेकांची तहान भागवित राहिला. अनेकांनी त्याला फसवले, लुबाडले,गंडविले तरी पैश्यावाचून त्याच्या टपरीतून अतृप्त पोटी कुणी परत गेलं नाही. बाहेरगावच्या ग्राहकांच्या भरोस्यावर तो आपल्या संसारगाडा ओढत होता. नफ्या तोट्याच्या तराजूवर त्याने व्यवसाय कधी केला नाही. कदाचित त्याच्याकडे मारवाडयांसारखा व्यावसायिक दृष्टीकोन नव्हता असंही आपण म्हणू शकतो परंतु असं असले तरी त्याच्यातला 'माणूस' आपल्याला नाकारता येत नाही.
एके वर्षी शासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पुंडलिक भाऊची टपरी हटविण्यात आली आणि म्हणावा तसा पुंडलिक भाऊ रत्यावर आला. मात्र हरणे त्याच्या स्वभावात नव्हते. घरच्या दोन एकर जमिनीत तो राबायला लागला. उन्हाळ्यात शेतीत काम नसते म्हणून त्याने सायकलवर मटका गुल्फी विकायला सुरवात केली. चार सहा वर्षे दर उन्हाळ्यात त्याचा विशिष्ट आवाज 'गुल्फी' हा शब्द म्हणत,सोबतच सायकलला टांगलेल्या घंटीचा आवाज गल्लोगल्ली फिरत होता. काही वर्षांपासून म्हणजेच त्याचे मुले कमवते झाल्यापासून पुंडलिकभाऊ आता घरीच असतो. दोन्ही मुलं सरकारी नोकरीत आहे. सरकारी नोकरीची वानवा असणाऱ्या परिस्थितीत त्याच्या दोन्ही मुलांना नोकऱ्या लागल्या. आज गावकरी म्हणतात, "पुंडलिकभाऊच संचित मुलाच्या कामी आलं. अनेकांनी पुंडलिक भाऊला बुडविल,फसविल मात्र देवाने त्याला व्याजासह परत केलं."
आयुष्यभर पुंडलिकभाऊ सरळमार्गाने चालत राहिला. व्यवसायाचे गणित त्याला कधी जमलं नाही मात्र 'माणुसकी' या भांडवलावर त्याने आयुष्यभर इनाम- इतबारे आपला व्यवसाय केला. वास्तविक पुंडलिक भाऊ हा काही एक 'व्यक्ती' नाही तर ती एक 'प्रवृत्ती' आहे जी तुमच्या-आमच्या प्रत्येकाच्या गावांत असते. शहर आणि खेडेगांवात फरक सांगता येतो, गांव समृद्ध असते आणि गावाला 'गावपण' येते ते अश्याच माणसांमुळे.....
मुकेश जाधव
9665419402
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment